Connect with us

मराठी कलाकार

‘कमनशिबी’ ठरला ‘नशिबवान’!भाऊ कदमची खंत.

News

‘कमनशिबी’ ठरला ‘नशिबवान’!भाऊ कदमची खंत.

गेल्याच आठवड्यात भाऊ कदमचा ‘नशिबवान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र, आजच्या तारखेला ‘नशिबवान’ चित्रपटाला थिएटरच नसल्याचं दुर्दैवी चित्र पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या शोसाठी थिएटर उपलब्ध होण्याच्या बाबतीत ‘नशिबवान’ चित्रपट ‘कमनशिबी’ ठरला आहे. बहुतांशी मराठी चित्रपटांप्रमाणेच याही चित्रपटाच्या बाबतीत उपेक्षा आली आहे. ‘मराठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात असूनही ‘नशिबवान’ला थिएटरमध्ये एकही स्क्रीन मिळू नये याची मला खंत आहे’, अशी भावना कॉमेडी किंग भाऊ कदमने व्यक्त केली आहे. भाऊने फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करुन आपली खंत जाहीरपणे व्यक्त केली आहे.

भाऊ कदमची मुख्य भूमिका असलेला ‘नशिबवान’ हा सिनेमा 11 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमात भाऊ कदमने महानगरपालिकेच्या एका सफाई कर्मचाऱ्याची भूमिका साकारली आहे. या सिनेमात भाऊ कदमसोबतच मिताली जगताप – व्हराडकर, नेहा जोशी आणि जयवंत वाडकर सारखे कलाकार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अमोल गोळे यांनी केलं आहे. या सिनेमातून संपूर्ण महाराष्ट्राची साफसफाई करणाऱ्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि त्यांच जीवन यामधून उलगडलं आहे. आणि याच सिनेमाला थिएटर्सने नाकारलं असल्याची गोष्ट समोर आली आहे. बॉलिवूड सिनेमांमुळे कायमच मराठी सिनेमांना डावलण्यात येतं तसेच आता इतर भाषिक सिनेमांना देखील महाराष्ट्रात शो मिळतात. मग फक्त मराठी सिनेमांवर ही परिस्थिती का? असा सवाल भाऊ कदम यांनी या पोस्टमधून विचारला आहे.

एक नजर टाकूया, भाऊने नेमकं काय म्हटलंय त्यावर…

एखादा परभाषीय चित्रपट ‘हिट’ होऊन जातो आणि रातोरात आपल्या मराठी चित्रपटाला महाराष्ट्रातच चित्रपटगृहातुन पायउतार व्हावं लागतं. वाटेल ती आणि वाटेल तशी समीकरणं मांडून हे दाखवलं जातं की तुमचा ‘मराठी’ चित्रपट चालतच नाही. मध्यमवर्गीयांसाठी बनवलेल्या चित्रपटाला सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत चित्रपटगृहात काही मोजकेच शो दिले जातात, जेव्हा आमचा मराठी चाकरमानी माणूस आपापल्या कामाच्या ठिकाणी असतो. मग बोंब उठवली जाते की, तुमचा मराठी चित्रपट बघायला तुमचेच मराठी प्रेक्षक येत नाहीत. ‘नशीबवान’च्या निमित्ताने मला आणि माझ्या निर्मात्यांना ह्याचीच प्रचिती आली.
ज्या डोंबिवली चा उल्लेख मी हवा येऊ द्या च्या प्रत्येक भागात करतो, ज्या ‘डोंबिवलीचा मी’ म्हणून मी गर्वाने सांगतो, तिथेसुद्धा ‘नशीबवान’ ला पहिल्या आठवड्यात एकही चित्रपटगृह, एकही शो मिळाला नाही. आमचा संपुर्ण चित्रपट मुलुंड मधे चित्रित झाला आहे. तिथेही एकाही चित्रपटगृहात ‘नशीबवान’ ला स्थान मिळाले नाही. कित्येक लोक चित्रपटगृहात जाऊन परत फिरले आणि ऑनलाइन बुकींग करून गेलेल्यांना शो कॅन्सल झाल्याचे कारण देऊन ‘हिट’ झालेल्या हिंदी चित्रपटाची तिकिटं त्यांच्यावर लादली गेली. एका दाक्षिणात्य चित्रपटाने ह्या आठवड्या अखेरीस मुंबईत सव्वाशेहून अधिक शो अडवले पण आपण आपल्या महाराष्ट्रात मराठी चित्रपटासाठी साधा एक शो राखू शकत नाही. काबाडकष्टाने चित्रपट तयार करणारे निर्माते आता प्रदर्शनासाठीही खस्ता खात आहेत. एक-एक चित्रपटगृह मिळवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय.

Comments

More in News

To Top