Connect with us

मराठी कलाकार

‘कोण होणार करोडपती’चे सूत्रसंचालन करणार नागराज मंजुळे!पहा टिझर.

News

‘कोण होणार करोडपती’चे सूत्रसंचालन करणार नागराज मंजुळे!पहा टिझर.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेली कित्येक वर्ष सोनी टीव्हीच्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या माध्यमातून प्रेक्षकांना स्वप्नपूर्तीची वाट दाखवत आहेत. आपल्या बुध्दीच्या जोरावर सगळं काही शक्य आहे, असं सांगणारा कार्यक्रम म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनाही आपल्या स्वप्नांचा महाल बांधता यावा म्हणून सोनी मराठी आता ‘कोण होणार करोडपती’चं नवं पर्व घेऊन येत आहे. मराठीच्या या नवीन पर्वाचं सूत्रसंचालन कोण करणार यावरून पडदा उचलण्यात आला आहे.

‘कोण होणार करोडपती’ या लोकप्रिय मराठी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे करणार आहेत. नागराज मंजुळे एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सामाजिक विषयांना वाचा फोडून मराठी सिनेमात आपलं आगळंवेगळं स्थान निर्माण करणारा दिग्दर्शक आणि अभिनेता नागराज मंजुळे आता आपल्याला एका नव्या भूमिकेत दिसून येणार आहे. याबाबत स्वतः नागराज मंजुळेने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक टीझर पोस्ट करत माहिती दिली आहे. सोनी मराठी वाहिनीवर लवकरच हा रियालिटी शो सुरु होणार आहे. नागराजच्या रांगड्या भाषेचा साज आता या रियालिटी शो ला लागणार असल्याने या शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

‘कोण होणार करोडपती’चे हे तिसरे पर्व आहे. पहिल्या पर्वाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर यांनी केले होते. तर दुसऱ्या पर्वात ती जबाबदारी स्वप्निल जोशीने पार पाडली होती. कौन बनेगा करोडपतीच्या यशात या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाचा खूप मोठा महत्वाचा वाटा असतो. नवीन पर्वाची घोषणा झाल्यापासूनच सूत्रसंचालक कोण असणार याची उत्सुकता होती. आता नागराज मंजुळेंचं नाव समोर येताच या पर्वाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

Comments

More in News

To Top