Connect with us

मराठी कलाकार

एखाद्या तरुणाप्रमाणे एनर्जेटिक आहेत सचिन पिळगांवकर-दिग्दर्शक गजेंद्र अहिरे

Actor

एखाद्या तरुणाप्रमाणे एनर्जेटिक आहेत सचिन पिळगांवकर-दिग्दर्शक गजेंद्र अहिरे

अभिनय, नृत्य, संगीत अशा एक ना विविध कलेत पारंगत असणारे महाराष्ट्राचे महागुरू म्हणजेच जेष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर. गेली तीन दशके रसिकांना विविध माध्यमातून मनोरंजन करणारे सचिन पिळगावकर यांची एनर्जी आजही तरुणांना लाजवेल अशीच आहे. मराठी रसिकांवर आजही ते अधिराज्य गाजवत आहेत. त्यांची एनर्जी लेव्हल दाखवणारा असाच किस्सा घडला ‘सोहळा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान. या चित्रपटाचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी सचिन पिळगांवकर यांच्या शिस्तीविषयी यानिमित्ताने एक नवी ओळख करून दिली.

“गेली कित्येक वर्षे सचिनजी या क्षेत्रात काम करत असले तरीही त्यांची एनर्जी एखाद्या तरुणाप्रमाणेच आहे. प्रत्येक गोष्ट शिकून, समजूनच ते आत्मसात करतात. एवढेच नव्हे तर त्यांच्यातील शिस्तप्रियताही तरुणांनी शिकून घ्यायला हवी. या सिनेमातील एक दृश्य भल्या पहाटेचे आहे. वातावरणातील निळ्या रंगात हा सीन शूट करायचा होता. पहाटे ४- ४.३० च्या दरम्यान समुद्र किनारी निळा रंग पसरतो. केवळ १० ते १५ मिनिटेच वातावरणाचा हा अविष्कार असतो. मात्र सचिन पिळगावकर, विक्रम गोखले, मोहन जोशी, लोकेश गुप्ते यांनी पहाटे येऊन हे शूट पूर्ण केले. कामाप्रती असलेली ही त्यांची निष्ठा वाखणण्याजोगी आहे. कलाकाराचे यश हे त्यांच्या कामावर असलेली निष्ठा आणि त्यांच्या अंगी असलेल्या शिस्तीवरच अवलंबून असते. म्हणूनच सचिन पिळगांवकर आजही मराठी रसिकांसाठी प्रिय आहेत.” असं ‘सोहळा’ चित्रपटाचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी सांगितले.

येत्या २१ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘सोहळा’ या सिनेमात एकूण चार गाणी असून नरेंद्र भिडे यांचे संगीत सिनेमाला लाभले आहे. अरिहंत प्रॉडक्शन या बॅनरखाली सिनेमाची निर्मिती करण्यात आली असून सोहन बोकाडिया व सुरेश गुंदेचा हे निर्माते आहेत. तर के.सी बोकाडिया यांनी सिनेमाची प्रस्तुती केली आहे.

 

Comments

More in Actor

To Top